लाडक्या लालबागच्या राजाला 22 तासांनी निरोप, हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं केलं विसर्जन

 


                मुंबई, - राज्यभरात कालपासून गणरायाच्या विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजाला गिरगाव चौपाटीवर निरोप देण्यात आला. लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला पोहोचला.

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला येताच भाविकांनी मोठी गर्दी केली. लालबागच्या राजावर फुलांची उधळण करण्यात आली. राजाची मिरवणूक येताच गिरगाव चौपाटीवरील भाविकही बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झाले. त्यानंतर हळूहळू ही मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघाले. बाप्पाला तराफात बसवले. त्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली.

सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांचा जनसागर लोटला होता. जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर राजाला निरोप देण्यात आला.

दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. मात्र, सकाळी समुद्राला ओहोटी असल्याने विसर्जनसाठी आलेले लालबागच्या राजासह अनेक गणपती रांगेतच होते. समुद्राला भरती आल्यानंतर लालबागचा राजाला तराफ्यावर ठेवण्यात आलं. आरती करण्यात आली आणि त्यानंतर विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ करण्यात आलं. 

लालबागच्या राजाला कोळी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी होत्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता.

Followers