पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

 


पुणे,; -  पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. या मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठीच ९ तासांहून अधिक वेळ लागला. यानंतर आता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. तसेच मिरवणूक मार्गावरील इतर गणेशांचंही आता यथावकाश विसर्जन पार पडणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, ढोल ताशा पथक आणि पारंपरिक पद्धतीने पुण्यातल्या पाचही मानाच्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला. यामध्ये मानाचा पहिला 'कसबा गणपती'चं ४.३६ मिनिटांनी विसर्जन पार पडलं.

त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन ५.१२ मिनिटांनी झालं. तसेच मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन ५.५३ मिनिटांनी त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपीतीचं विसर्जन ६.३२ वाजता तर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन ६.५९ वाजता पार पडलं.

दरम्यान, यंदा पहिल्यांदाच श्रीमंत दगडुशेठ हालवाई मंडळाच्या गणपतीचं प्रस्थान दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झालं. त्यानंतर तो ही मुख्य मिरवणूक मार्गात सामिल झाला. पण अद्याप सर्वांचं आकर्षण असणाऱ्या या गणपतीचं विसर्जन झालेलं नाही.

या गणेशाचं विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकींना वेग येईल. यापूर्वी दगडुशेठ हलवाई गणपतीच्या प्रस्थानालाच रात्र व्हायची त्यामुळं पुढे मुख्य मिरवणुकीला उशीर व्हायचा, हा उशीर टाळण्यासाठी यंदा गणपतीचं लवकर प्रस्थान करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे.

यंदा नेहमीपेक्षा कमी वेळेत मिरवणुका संपतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण तरीही नेमकी किती तास याला वेळ लागेल हे पाहणं महत्वाचं आहे.

Followers