शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने बदलांचे आदेश जारी

 


                    पुणे : पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभाग, हडपसर, खडक, डेक्कन, भारती विद्यापीठ आणि लोणी काळभोर वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूक बदल तसेच पार्किंग व्यवस्थेतील बदलाच्या अनुषंगाने काही अंतिम आदेश तसेच काही तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

               यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवरील सूचना व हरकतींचा विचार करुन काही अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन ॲन्टी करप्शन शाखा कार्यालय व निवासस्थानाच्या समोरील मुख्य रस्त्यावर म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून डावीकडे संरक्षण भिंतीच्यालगत १०० मीटर अंतरापर्यंत व सीबीआय ॲन्टी करप्शन शाखा कार्यालयाच्या डावीकडील संरक्षण भिंती लगत मुख्य रस्त्यापासून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५०  मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग करण्यात आले आहे. 

            हडपसर वाहतूक विभागांतर्गत संजीवनी हॉस्पिटल ते सिरम कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पी १ व पी २ पार्किंग करण्यात आले आहे. अमर कोर्टयार्ड सोसायटी ते सिद्धेश्वर हॉटेलपर्यंत पी १ व पी २ पार्किंग करण्यात आले आहे. खडक वाहतूक विभागांतर्गत धनवस्ती आयकॉन बिल्डिंग, बदामी हौद चौक ते शिंदे आळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५० मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे. बदामी हौदाकडून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर फक्त दुचाकी वाहनांकरिता पी १ व पी २ पार्किंग करण्यात आले आहे. डेक्कन वाहतूक विभागांतर्गत १२२८/बी, ग्रीन अपार्ट., आपडे रोड, पुणे या अपार्टमेंट समोरील उत्तरेस असलेल्या रस्त्यावर डी.पी. बॉक्स ते व्हिनस लेनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस तसेच याच अपार्टमेंटसमोरील पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर डी. पी. पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आले आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत दत्तनगर चौकापासून संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे.

            याशिवाय काही तात्पुरते आदेशही जारी करण्यात आले असून त्याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार डेक्कन वाहतुक विभागांतर्गत गांधी क्लासीक अपार्ट. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/ ३४ पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे. मॅजेस्टीक विल्स पासून पुढे लाईट डी.पी. शेजारी असलेल्या शेफालिका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे. लोणी काळभोर वाहतूक विभागांतर्गत कॅफे मिलन ते महामार्ग अंडरपास पर्यंत सेवा रस्त्यावर नो पार्किंग करण्यात येत आहे. शंभो स्नॅक्स ते एम. आय. टी. महाविद्यालयपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. तसेच डी.के. वाईन्स ते एम. जी. वेफर्स अॅन्ड बाईट्स पर्यंत सेवा रस्त्यावर नो पार्किंग करण्यात येत आहे.

            भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत तीन हत्ती चौकाकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे. तीन हत्ती चौकाकडून तळजाई स्मशानभूमीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे. तीन हत्ती चौकाकडुन शनिमंदिर, पद्मावतीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे. तसेच भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस ठाणे इमारतीच्या उत्तर बाजूकडील पायऱ्यापर्यंत १०० फूट सेवा रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजू व भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस ठाणे इमारतीच्या उत्तर बाजूकडील भिंतीच्या टोकापर्यंत पूर्वेकडील बाजू नो पार्किंग करण्यात येत आहे. 

            भारती पोलीस स्टेशन इमारतीच्या पायऱ्यापासुन पुढे पोलीस स्टेशनच्या उत्तर बाजूकडील भिंतीच्या टोकापर्यंत पोलीसांची सरकारी चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी मार्किंग करून जागा आरक्षित करण्यात येत आहे. व त्यापासून पुढे चैतन्यनगरकडे डावीकडे वळणाऱ्या रस्त्याच्या टोकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंना दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता पी-१ पी-२ पार्कींग करण्यात येत आहे. त्यामध्ये ५० फुट अंतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खाजगी दुचाकी वाहने पार्क करण्याकरीता जागा आरक्षित करण्यात येत आहे.

            येरवडा वाहतुक विभाग पुणे अंतर्गत गोल्फ क्लब चौक ते शास्त्रीनगर चौक या मार्गावर दोन्ही बाजूस व गोल्फ क्लब चौकाकडून गुंजनकडे जाणारे मार्गावर ओव्हर ब्रिजच्या शेवटपर्यंत नो हॉल्टिंग झोन करण्यात येत असल्याचा तात्पुरता आदेशाही जारी करण्यात आला आहे.

             वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ९ ऑक्टोबरपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उप आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

0000

Followers