उत्साही पण धिम्या गतीने पार पडली सासवडची विसर्जन मिरवणूक.....

 


                    सासवड (प्रतिनिधि) ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीेत, डी जे च्या तालावर मोठ्या संख्येने नाचणारी तरूणाई, महिलांची लक्षणीय उपस्थिती, अधून मधून पावसाची हजेरी अशा वातावरणात सासवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक तब्बल बारा तासांनी उत्साही व शांततेत पार पडली.सायंकाळीं साडे पाच नंतर मुख्य चौकात दाखल झालेले विद्युत रोषणाई केलेले गणपती मंडळांची संख्या केवळ आठ असूनही सुमारे सात तास मिरवणूक अत्यंत धीम्या गतीने चालली. रात्रीं एकच्या सुमारास अखेरच्या मंडळाच्या श्रींचे विसर्जन झाले

                


प्रथेप्रमाणे दुपारी बारा वाजता मानाच्या अमर मंडळाच्या श्रींची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष जाधव व पालिका मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या मिरवणुकीत के के म्युझिकल व पुरंदर ब्रास बँडने रंगत आणली. संजय चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. दुपारी दोन वाजता सासवड पोलिस स्टेशनच्या श्रींची मिरवणूक निघाली कामावरील पोलिस मित्रांनी यावेळी ठेक्यावर नाच करण्याचा आनंद घेतला. त्या नंतर काही वेळातच श्री शिवाजी व्यायाम मंडळाची मिरवणूक  पहिलवान मंडळींच्या हजेरीत मार्गस्थ झाली.

      सायंकाळी पाच वाजता अखिल सोपान नगर मंडळाची मिरवणूक मुख्य चौकात आली. पुण्याच्या आरंभ ढोल ताशांच्या पथकाने व त्यातील मारुतीच्या वेशातील युवकाने आणि अत्यंत सुंदर फुलांची सजावट केलेल्या रथामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली त्या नंतर सोपान नगर भागातील खंडोबा नगरातील लमाण बंधूंच्या श्री सेवालाल मंडळाची मिरवणूक आली. महिलांनी गाण्याच्या तालावर केलेले नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. त्या पाठोपाठ आणखी एका लमाण वस्तीतील जय हनुमान मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली.सायंकाळीं सात वाजता अजय मंडळ, त्या नंतर टप्प्याटप्प्याने संत गोरा कुंभार आचार्य अत्रे, श्रीनाथ, जय महाराष्ट्र, राजर्षी शाहू मंडळ लांडगे आळीतील महात्मा फुले मंडळ व अखेरीला श्री दत्त मंडळाच्या मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली रात्रीं उशीरा दाखल झालेल्या मंडळांच्या मिरवणुका आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने नयनरम्य झाल्या. अनेक मंडळांनी व घरगुती गणेश मुर्तींचे वटेश्वर मंदिर परिसरात तसेच सासवड आंबोडी रस्त्यांवरील नदीत विसर्जन पार पडले.

 


पुण्यातील आरंभ ढोल ताशा पथक, नाद मय युवा मंच पथक, तांडव ढोल ताशा पथक, पुरंदर बँड पथक यांचे सुंदर सादरीकरण.... अनेक मंडळातून

महिलांचा लक्षणीय सहभाग.. डी जे चा दणदणाट

कागदी फुले व फटाक्यांचा अतिरेकी वापर... काही मंडळाच्या मिरवणूकीत मद्यपिंचा अनावश्यक नाच.. जय प्रकाश चौकात बराच वेळ रेंगाळलेल्या मिरवणुका... सासवड नगर पालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांच्या सत्काराची परंपरा... मै हू डॉन, नाचरे मोरा.. बाण नजरेचा या गाण्यांची चलती... लेझर किरणांचा वापर.... दोन वेळा विद्युत पुरवठा खंडित... जय प्रकाश चौकात रात्रीं उशीरा पर्यंत मिरवणूक पाहण्यासाठी झालेली गर्दी.. गुलालाचा अगदी माफक वापर पोलिस यंत्रणेचां पुरेसा बंदोबस्त पण मिरवणूक पुढे जाण्यासाठी न घेतलेली तसदी.. अशा स्वरूपात हा सोहळा शांततेत पण उत्साहात साजरा करण्यात आला.)

      दरम्यान सकाळी लवकरच संगमेश्वर मंदिर आणि संत सोपानदेव मंदिरा जवळ घरगुती गणेश विसर्जन

करण्यासाठीं भाविकांनी गर्दी केली होती. नगर पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुंडात सर्वच मुर्तींचे विसर्जन झाले व निर्माल्य कलश मध्ये सर्व निर्माल्य गोळा करण्यात आले. पालिकेचा या स्तुत्य उपक्रमला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य केल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण व आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी सांगितले. आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी ओम् साई मंडळ, शिव साम्राज्य, संत सावता माळी मंडळ, सुवर्णनगरी, जेजुरी नाक्या वरील गणपती, साठे नगर आदी मंडळांच्या विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या.



Followers