चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’ ; भूमिपूत्र मोरे कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी
पिंपरी । प्रतिनिधी - चिखली- नेवाळेवस्ती येथील जयहरी हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यामुळे २० वर्षांपासून स्थानिक रहिवाशांची होणारी परवड थांबली असून, या कामी जागा मालक मोरे कुटुंबियांनी भूसंपादनासाठी सामाजिक बांधलकी जपत सकारात्मक पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जागा मालक आणि रहिवाशी यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चिखली- नेवाळेवस्ती येथील गट नंबर १२४४ येथील जयहरी हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करावा केला. विद्यार्थी- गृहिणी यांना चिखलातून मार्ग काढत शाळा- मार्केटमध्ये जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा तगादा लावला होता.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागा मालक माजी नगरसेवक गिताराम मोरे, बाळासाहेब मोरे, पांडुरंग मोरे, जालिंदर मोरे, काळुराम मोरे, सोपान मोरे, अनिल मोरे, गोरख मोरे, तन्मय मोरे आणि प्रकाश मोरे यांच्यासोबत चर्चा केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घेण्याबाबत विनंती केली. गिताराम मोरे आणि सर्व जागा मालकांनी सामाजिक कार्य म्हणून सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला, अशी माहिती जयहरी हाऊसिंग सोसायटीचे चंद्रकांत शेवते यांनी दिली.
***
जागामालक आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाअभावी अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे. चिखली-नेवाळे वस्ती येथील सुमारे दीड हजार नागरिकांना गेल्या २० वर्षांपासून रस्त्याची प्रतिक्षा होती. याबाबत मोरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवून रस्त्याच्या कामासाठी सकारात्मक पुढाकार घेतला. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघाला आहे. मोरे कुटुंबियांचे खऱ्या अर्थाने योगदान आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.