मुंबई , :- ' भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, भारताची कृषी क्षेत्रातील, मृद व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉ. स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचे फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारताने अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉ. स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कार्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरितक्रांतीचे जनक हे बिरूद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळले. जागतिक स्तरावर डॉ. स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचे निधन देशाचे मोठे नुकसान आहे.