लोणीकंद, : बकोरी (ता. हवेली) येथील वारघडे कुटुंबातील २५ वर्षीय अक्षयचा हदयविकाराने मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आरोग्य जागृती व्हावी, याकरिता वारघडे कुटुंबाने जुन्या परंपरेला फाटा देत अक्षयच्या दशक्रिया विधीप्रसंगी डॉ. प्रकाश शिंदे यांचे आरोग्याविषयी व्याख्यान ठेवून आरोग्य प्रबोधन तसेच वृक्ष वितरण करून पर्यावरण संवर्धनचा संदेश दिला.
बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांचा पुतण्या दिवंगत अक्षय दत्तात्रेय वारघडे याचे ऐन पंचविशीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनाला चटका लावणारी ही घटना कोणाच्याही घरात घडू नये, यासाठी वारघडे यांनी पारंपरिक प्रवचनाला फाटा देत अक्षयच्या दशक्रिया विधीप्रसंगी कोरेगाव भीमा येथील डॉ. प्रकाश शिंदे यांचे आरोग्याविषयी व्याख्यान आयोजित केले. या वेळी डॉ. शिंदे यांनी योग्य आहार, विहार, तणावमुक्ती तसेच आदर्श जीवनशैली कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर वारघडे परिवाराकडून उपस्थितांना लक्ष्मीतरूच्या रोपांचे वितरण करून पर्यावरण संवर्धनचा संदेश दिला. या प्रसंगी वृक्षमित्र प्रभाकर जगताप यांनी बहुउपयोगी लक्ष्मीतरू विषयी माहिती दिली.या वेळी उपस्थित आमदार अशोक पवार यांनीही वारघडे परिवाराच्या या उपक्रमांचे कौतुक करून अशा विधायक उपक्रमाची समाजात गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी विविध संस्थांवर काम करणारे पदाधिकारी, वृक्षमित्र, माहिती सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.