आयटीआय संस्थातील विद्यार्थी व लोकसहभागातून गड-किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम : मंत्री मंगल प्रभात लोढा

 



                मुंबई, : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी  नजिकचा परिसर स्वच्छता  आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख -एक तास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ ऑक्टोबर रोजी  परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर  रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशी (आयटीआय) संपर्क साधावा.

                आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 व्या वर्षानिमित्त कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते 15 डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन व हे अभियान यशस्वी करूया असे आवाहन ही मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

                व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी म्हणाले, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक आय.टी.आय.आपल्या नजीकच्या गड किल्ल्यावर व परिसर स्वच्छता मोहीम स्थानिक नियोजनानुसार स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबविणार आहे.

Followers