पुणे, : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत पुरंदर तालुक्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील भात पिकाकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी, मुंबई यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील ३-४ आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यापेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यापेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव) व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधीक सूचकांच्या (प्रॉक्सी इंडिकेटर) आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची तरतूद आहे.
पावसातील ३-४ आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, पर्जन्यातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यापेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधीक सूचकाच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार भात पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड, राजेवाडी, भिवडी, परिंचे, वाल्हे व शिवरी या भात पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. सासवड, राजेवाडी महसूल मंडळ गटामध्ये मागील ७ वर्षाची सरासरी उत्पादकता २३११.६० किलो प्रतिहेक्टरी असून संयुक्त सर्वेक्षणानुसार १८४.९२ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे. भिवडी महसूल मंडळ गटात मागील ७ वर्षाची सरासरी उत्पादकता २३७३.६० किलो प्रतिहेक्टरी असून संयुक्त सर्वेक्षणानुसार ७०४.३३ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे. तसेच परिंचे, वाल्हे व शिवरी महसूल गटात मागील ७ वर्षाची सरासरी उत्पादकता २२६७ किलो प्रतिहेक्टरी असून संयुक्त सर्वेक्षणानुसार ७६०.५४ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे.
भात पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील व नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
000