राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदिल; भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश , तीन नवीन शाखा कार्यालय, अतिरिक्त मनुष्यबळाचा मार्ग मोकळा
पिंपरी । प्रतिनिधी भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह औद्योगिक पट्टयातील वीज समस्या आता निकालात निघाली आहे. महावितरण प्रशासनाकडून आकुर्डी व भोसरी उपविभागाचे विभागाजन भोसी-१ आणि भोसरी- २ असे करण्यात येणार आहे. तसेच, तीन नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भोसरी मतदार संघातील वीज समस्या सोडवण्यासाठी वीज ग्राहकांना ऐन गणेशोत्स्वात ‘‘ गणपती बाप्पा पावला’’ आहे.
महावितरण संदर्भातील प्रस्तावित वीज विषयक कामांसाठी व निधी मिळणेबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. जुलै-२०२३ मध्ये मुंबई येथे झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला आता यश मिळाले आहे.
महावितरणच्या भोसरी विभागांतर्गत औद्योगिक व घरगुती असे सुमारे ३ लाख ७० हजार वीजग्राहक आहेत. एका शाखा कार्यालयांतर्गत १६ तांत्रिक कर्मचारी सुमारे ४० ते ६० हजार ग्राहकांना सेवा अखंडित वीज सेवा देण्यासाठी कार्यरत असतात. ग्राहक संख्या जास्त असल्यामुळे वीजसमस्या आणि तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढल्या आहेत. भौगोलिक कार्यक्षेत्र आणि वीज मागणी याचा विचार करता भोसरी गाव व आकुर्डी विभागाचा काही भाग असे विभाजन करुन नव्या उपविभागाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, स्पाईन सिटी, इंद्रायणीनगर आणि चिखली शाखा कार्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीत अतिरिरक्त कर्मचारी वर्ग मिळेल. मोशी आणि संभाजीनगर शाखा कार्यालय अंतर्गत अंदाजे दीड लाख ग्राहकांना सेवा देण्यासाठी केवळ ३२ कर्मचारी होते. नवीन शाखा कार्यालयाच्या निर्मितीमुळे ती संख्या ४८ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे ग्राहक सेवा सुधारणा आहे. चिखली गाव परिसरात सुमारे २९ हजार वीज ग्राहक आहेत. नवीन शाखा कार्यालयामुळे या ठिकाणी अतिरिक्त १६ कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. याचप्रमाणे स्पाईन सिअी आणि इंद्रायणीननग एमआयडीसी शाखा कार्यालयासाठी अतिरिकत मनुष्यबळ मिळणार आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, समाविष्ट गावांतील वीज समस्या सोडवण्यासाठी वीज उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे वर्षभरात हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती होईल. त्यामुळे नवीन विकसित भागातील वीज पुरवठा सक्षम होईल. यासोबतच सध्या या भागातील वीज पुरवठ्याचा अतिरिकत भार गावठाण भागांवर होत आहे. तो कमी होणार असल्यामुळे गावठाण आणि समाविष्ट भाग असे दोन्ही परिसरात वीज पुरवठा सुरळीत आणि सक्षम होणार आहे. कारण, पायाभूत सुविधांसह आता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, आगामी ५० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वीज विषयक पायाभूत सुविधा निर्मिती करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्याला यश मिळत असल्याचे समाधान आहे.
***
भोसरी विधानसभा मतदार संघात औद्योगिकरण आणि नागरीकरण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रशासन आणि वीज वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. याबाबत २०१४ पासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात इन्फ्रा-१ आणि इन्फ्रा- २ ची कामांसाठी पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात वीज विषयक कामे पुन्हा लांबणीवर पडली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात या प्रश्नाबाबत सरकारचे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडचा उल्लेख ‘‘फ्युचर मेगासिटी’’ असा करीत सभागृहात वीज समस्या सोडवण्याबाबत पायाभूत सुविधा सक्षम करण्याची घोषणा केली होती. त्याला आता मूर्त स्वरुप आले आहे. प्रशासनाने तात्काळ या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवावी आणि आगामी वर्षभरात काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.