बारामती : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट-पुणे विभाग कार्य़ालय) संस्थेमध्ये ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणेबाबत करार झाला.
मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) हा जागतिक बँक अर्थ सहाय्यीत प्रकल्प महाराष्ट्रात राबविला जातो. मुख्यत: कृषी विभाग आणि अन्य संलग्न विभागांमार्फत ‘मूल्यसाखळी विकास’ क्षमता बांधणी कार्यक्रमाला अधिक गतीने चालना दिली जाते.
या प्रकल्याचा कालावधी २०२० ते २०२७ पर्यंत आहे. स्मार्ट-पुणे विभागाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे यांच्या उपस्थितीत वरील करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
तसेच या प्रकल्पासाठी कृषी सचिव अनुपकुमार व स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडे उपलब्ध असणारे कुशल मनुष्यबळ, सोयीसुविधा, नेदरलँड्स या देशासमवेत असणारे सामंजस्य करार, उपलब्ध तज्ञांच्या सुविधांमुळे सदरचा प्रस्ताव स्मार्ट कार्यालय, पुणे व वर्ल्ड बँकेने मान्य केला.
या करारामधून निश्चितच उत्तम पिक उत्पादन पद्धती, फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात व्यवस्थापन व याच पिकांची मूल्यवर्धित साखळी निर्माण होईल, असे मत अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. समुदाय आधारित संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र स्थानी ठेवून फळे, भाजीपाला मूल्यसाखळी विकासाकरिता स्मार्ट प्रकल्प महत्वपुर्ण ठरला आहे, असे त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी प्रकल्प समन्वयक यशवंत जगदाळे म्हणाले,`` स्मार्ट प्रकल्प करारानुसार प्रशिक्षण कार्य़क्रमातून यापुढे २० तज्ज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत. या तज्ज्ञांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरच्या कालावाधीत हे तज्ञ प्रशिक्षक ‘स्मार्ट’ प्रकल्पातील समुदाय आधारित संस्थांमधील ८०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतील.
फळे व भाजीपाला मूल्यवर्धित साखळी विकास संदर्भाने कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाला या प्रक्रियेत महत्व दिले आहे. व्हॅन हॉल लॉरेंनस्टाईन विद्यापीठ- नेदरलँड्स, बारामती कृषि विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्र (इंडो-डच प्रकल्प), हॉलंडडोअर कंपनी नेदरलँड्स व अटल इनक्युबेशन सेंटर,बारामती यामधील तज्ञांनीही वरील प्रकल्पांतर्गत विशेष कृती आराखडा तयार केला आहे. `` यावेळी अटल इंकुबेशन सेंटरच्या मुख्य अधिकारी जया तिवारी उपस्थित होत्या.