शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय साहित्य देण्यासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती, दौंड तालुक्यातील शाळांना साहित्याचे वितरण
बारामती, : शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय साहित्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विद्या प्रतिष्ठान येथे बारामती आणि दौंड तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्याच्या वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष नागनाथ केंगल, सचिव अरुण थोरात, सिकंदर शेख, संदीप जगताप, रामचंद्र नातू, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ आमदार निधीतून पुणे जिल्ह्यात विविध शाळेत साहित्य वितरणाचे चांगले काम झाले आहे. शासनाने आमदार निधीमध्ये वाढ केल्याने विविध कामे पूर्ण होत आहेत. महाज्योती, सारथी, बार्टी अशा विविध संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थांना विद्यार्थांच्या प्रगतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उद्योग, व्यवसाय, रोजगार, स्वयंरोजगार अशा विविध क्षेत्रातील शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.
श्री. पवार पुढे म्हणाले, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना खासगी शिकवणीचे शुल्क परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच गुणवत्तापूर्व शिक्षण मिळणे आवश्यक आहे. पूर्वी लिहिता वाचता येई तो साक्षर समजला जायचा. पण सध्या संगणकाचे युग आहे ज्याला संगणकाचे ज्ञान आहे तो साक्षर समजला जातो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासह गुणवत्तापूर्ण कौशल्यावर आधारित शिक्षण द्यावे. जगात इंग्रजी व्यवहार भाषा समजली जात असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत तरबेज करावे.
विद्यार्थ्यांना करियर निवडीचे स्वातंत्र्य द्यावे
पालकांनी आपल्या मुलांना आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. शिक्षकांनीही विविध करिअर विषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढण्यासाठी प्रोत्साहित करावे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी खूप महत्वाचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनीही जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार श्री. आसगावकर म्हणाले, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ आमदार फंडातून बारामती तालुक्यातील ५५ आणि दौंड तालुक्यातील ५१ अशा १०६ शाळांना अद्ययावत प्रिंटरचे वितरण करण्यात येत आहे. पुणे विभागात एकूण ५८ तालुके असून आजपर्यंत साडेअकराशे शाळांना प्रिंटर वितरण करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते काही शाळांना प्रिंटरचे वितरण करण्यात आले.
0000