सीआरपीएफच्या ‘यशस्विनीं’नी दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश ; महिला जवानांच्या ‘यशस्विनी रॅली’चे पुण्यात जोरदार स्वागत

 


                पुणे, : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ७५ महिला जवानांच्या ‘यशस्विनी बाईक रॅली’चे  शहरात सकाळी आगमन झाले. जिल्हा प्रशासनाकडून या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

            


कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सीआरपीएफचे डीआयजी वैभव निंबाळकर, डीआयजीपी राकेश कुमार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जामसिंग गिरासे आदी उपस्थित होते. 

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यावेळी म्हणाले, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे १ हजार पुरुषांमागे ९१२ महिला असे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. सीआरपीएफच्यावतीने काढण्यात आलेल्या यशस्विनी रॅलीमुळे हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                 कार्यक्रमादरम्यान माझी कन्या भाग्यश्री, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेतील लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दौंड येथील अंगणवाडी सेविकांच्या मुलीच्या जन्मास प्रोत्साहनपर पोवाड्याचे सादरीकरण झाले. पुण्यातील बालाजीनगर येथील व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर पथनाट्य सादर केले. 

              


 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नारायणगाव येथील अंगणवाडी सेविकांनी मंगळागौर कार्यक्रम सादर केला. सीआरपीएफच्या तळेगाव कॅम्प येथील जवानांच्या देशभक्तीपर सामूहिक नृत्यानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला महिला, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

                तत्पूर्वी यशस्विनी रॅलीतील ७५ महिला जवान सोलापूर, इंदापूरमार्गे पुणे शहरातील शनिवारवाडा येथे सर्वप्रथम आपल्या दुचाकी वाहनावरून दाखल झाल्या. यावेळी यशस्विनींचे ढोल ताशा वादन आणि औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत कलशपूजनही करण्यात आले.

                यशस्विनी रॅलीदरम्यान ठिकठिकाणी स्त्री जन्माचे आणि नारी शक्तीचे महत्त्व यांच्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीतील महिला बाईकर्स या आपल्या मार्गातील शहरांमध्ये जाऊन किशोरवयीन मुली, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी तसेच एनसीसी कॅडेट्स यांच्याशी संवाद साधून महिला सशक्तीकरण आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत संदेश देत आहेत. 

000

Followers