जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध ; दावे व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे, : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ बारटक्के, उज्ज्वला सोरटे, शीतल मुळे, नायब तहसीलदार सिताकांत शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, समाजातील सर्व घटकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याकरीता भारत निवडणूक आयोगाच्यावतीने काम करण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादीमध्ये वारंवार बदल होत असतात. त्यानुसार जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम सुरू आहे. गेल्या तीन वर्षात मतदार यादीत नाव, पत्ता, छायाचित्रे दुबार असणाऱ्या, मयत, स्थलांतरीत मतदारांची सुमारे आठ लाखापेक्षा अधिक नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मयत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
महाविद्यालयांना ‘उत्कृष्ट मतदार मित्र’ पुरस्कार
शहरी भागात मतदानाची टक्केवारी विचारात घेता युवा मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाविद्यालयस्तरावरही शिबारांचे आयोजन करण्यात येत आहेत. ‘उत्कृष्ट मतदार मित्र’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून १०० टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचा उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मागील निवडणुकीच्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील ३६ मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच युवा मतदारांची वाढ तसेच मयत मतदारांची नावे वगळून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी सर्व ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय सहायकाची (बीएलए) नियुक्ती करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे.
प्राप्त दावे व हरकतीवर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर, मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्राच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी व यादीच्या सीडीचे वितरण करण्यात आले.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख मतदारांची वाढ
जिल्ह्यात ५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ७९ लाख ५१ हजार ४२० तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी आहे. जानेवारी ते ऑक्टोबर याकालावधीत १ लाख २१ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे.
पुरुष मतदारांची संख्या जानेवारीमधील ४१ लाख ६६ हजार २६५ च्या तुलनेत ऑक्टोबरच्या यादीत ४२ लाख २५ हजार ९१८ इतकी आहे. तर जानेवारीमध्ये स्त्री मतदारांची संख्या ३७ लाख ८४ हजार ६६० इतकी तर ऑक्टोबरमध्ये संख्या ३८ लाख ४६ हजार ७४१ इतकी आहे.
जानेवारीच्या मतदार यादीमध्ये १ हजार पुरुषांच्या मागे ९०८ तर ऑक्टोबरमध्ये १ हजार पुरुषांमागे ९१० स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी समुदायाच्या संख्येत ४९५ वरुन ५२४ इतकी वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या १८ ते १९ वयोगटाची लोकसंख्या ३.१३ टक्के अर्थात ३ लाख ७१ हजार ३ आहे परंतु ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ०.६७ टक्के म्हणजेच ७९ हजार ३६२ युवकांची मतदार नोंदणी झाली आहे. २० ते २९ वयोगटाची लोकसंख्या २३.८६ टक्के अर्थात २८ लाख २७ हजार ३७६ इतकी आहे. मात्र, ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ११.५१ टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ६२४ मतदार नोंदणी झाली आहे.
0000