सासवड ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजूवडी, आणि खानवडी या सात गावांमध्ये राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे. तर कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होवू द्यायचा नाही यासाठी सात गावातील ग्रामस्थांनी चंग बांधला आहे. विशेष म्हणजे इकडे ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध वाढत असताना सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसून येत आहे. तब्बल सात वर्षे स्थानिक नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता किंवा शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकून घेता परस्पर घोषणा करीत असल्याने याचा निषेध म्हणून सात गावातील नागरिकांनी आपल्या घरावर काळ्या गुढ्या उभारून सरकारचा आणि प्रकल्पाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर मुंजूवडी, आणि खानवडी या सात गावांतील तब्बल २८३२ हेक्टर जमिनीचे विमानतळ प्रकल्पासाठी संपादन करण्यात येणार आहे एवढी मोठ्या प्रमाणात भूसंपादन होत असल्याने सातही गावे प्रकल्पबाधित होणार असून नागरिकांना आपापली गावे सोडून अन्यत्र कायमस्वरूपी जावे लागणार आहे. साहजिकच नागरिकांच्या मनात मोठी धाकधूक वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या गावच्या नागरिकांनी आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. आम्हाला प्रकल्पासाठी निर्वासित व्हावे लागत असेल तर प्रकल्प नको अशी भूमिका घेतली आहे. मात्र तरीही नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता किंवा चर्चा न करता विविध घोषणा थेट भूसंपादनाची तयारी करीत आहे.
दरम्यान प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मागील महिन्यात पारगाव येथे सातही गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा जाहीर विरोध व्यक्त केला होता. तसेच २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त घरावर काळ्या गुढ्या उभारून निषेध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार आज सोमवार दि. २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रकल्पग्रस्त सातही गावातील नागरिकांनी घरावर काळ्या गुढ्या उभारून निषेध व्यक्त केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होवू देणार नाही असा ठाम निर्धार केला.
वनपुरी येथे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरावर काळ्या गुढ्या उभारून प्रकल्पाचा निषेध नोंदविण्यात आला. माजी उपसरपंच लंकेश महामुनी, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी कुंभारकर, माणिकराव कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, शंकर कुंभारकर, अन्नासो कुंभारकर, शरद कुंभारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
चौकट टाकणे - आमच्यासाठी विमानतळ प्रकल्प उभारणार आणि आम्हालाच गावे सोडून जावे लागत असेल तर प्रकल्प नक्की कोणासाठी ? पिढ्यानपिढ्या आमचा या मातीशी संबंध आहे. शेतकऱ्यांनी या भागात अंजीर, डाळिंब, पेरू, सीताफळ यांच्या बागा लावल्या आहेत, पुरंदर उपसा योजनेतून प्रत्येक शेतात पाणी पोहोचले आहे. बहुतेक क्षेत्र बागायती असून आम्ही आमच्या गावात सुखी आहोत. उसाचे क्षेत्र वाढले असून आम्हाला साखर कारखाना द्या. अशी मागणी करतानाच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होवू देणार नाही असा निर्धार वनपुरी गावचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांनी व्यक्त केला.