पनवेल मध्ये मद्य विक्री दुकानाला सोसायटीधारकांचा विरोध; उपोषणाचा इशारा, खा. श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन
पनवेल प्रतिनिधी- येथील एन. के. हेरिटेज हौसिंग सोसायटीच्या आवारातील दुकानामध्ये मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली असून सदर दुकान धारकाकडून दुकान सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र सोसायटी धारकांची कोणतीच परवानगी न घेता राजकीय पाठबळाचा वापर करून हे दारू,वाईन विक्रीचे दुकान सुरू करण्यात येत असल्याचा आरोप सोसायटी धारकांनी केला आहे.
पनवेल रेल्वे स्टेशन रोड येथील एन के हेरिटेज गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील शॉप क्रमांक २८ मध्ये मध्ये विक्री दुकानास परवानगी देण्यात आली असल्याचे समजते. मात्र सदर परवानगी देताना सोसायटी धारकांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही अथवा सोसायटीची कोणतीच पूर्वपरवानगी घेण्यात आली नसताना सदर मद्य विक्री दुकानास परवानगी देण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.
या मद्य विक्री दुकानामुळे परिसरातील तरुण मुलांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. या बरोबरच लहान मुले, वयोवृद्ध व महिला, तरूण मुली यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने सोसायटी धारकांनी या निर्णयाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . त्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना उपोषणासाठी परवानगी मागितली आहे.
सोसायटी धारकांच्या मागणीला स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी यांच्यासह शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव, बहुजन समाज पार्टी व आम आदमी पार्टीचे स्थानिक पदाधिकारी यांचा पाठिंबा आहे. सदर मद्यविक्री दुकान सुरू झाल्यास तीव्र उपोषण, आंदोलन करण्याच्या निर्णयावर सोसायटीधारक ठाम असून तसे निवेदन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनाही देण्यात आले आहे.