छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजभवन येथून रवाना
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आज ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात राजभवन येथून रवाना करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी कूपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रेरणास्थान म्हणून उदयास येईल. शिवाजी महाराजांची दृष्टी काळाच्या पुढे होती. त्या काळात त्यांनी सागरी आरमाराचे महत्व ओळखून स्वत:चे नौदल उभारले. मुघल साम्राज्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालेल्या समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले. मुक्त व्यापार आणि उद्योगाचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. एक मजबूत आणि स्वावलंबी राज्य निर्माण करून आपल्या लोकांचे कल्याण सुनिश्चित करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यांचा न्याय आणि प्रामाणिक प्रशासनावर भर होता. शिवाजी महाराज हे समाजातील स्त्रियांचे महत्त्व ओळखणारे अग्रेसर होते. त्यांनी महिलांचा आदर केला आणि त्यांना संरक्षण दिले, त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता सुनिश्चित केली, असे राज्यपालांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपल्या संरक्षण दलांनी राजधानीच्या बाहेर त्यांचे प्रमुख राष्ट्रीय समारंभ आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यानुसार यावर्षी 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मध्ये भारतात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमीतील युवांनी देशासाठी अधिकाधिक पदके जिंकावीत, यासाठी त्यांना आतापासून विविध खेळांसाठी तयार केले पाहिजे, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे, ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा मिळेल. हा पुतळा त्यांना मोठे पाठबळ देईल. तेथील स्मारकासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन निश्चितपणे करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा आहे. त्यातूनच आपण शिवछत्रपतींच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन वर्षात आग्रा येथे आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. विविध उपक्रम राबविले. शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार आपण केला. ही अभिमानाची बाब आहे. ती राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील. आपले सण, उत्सव अधिक उत्साहाने साजरे केले. आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याचा, वाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २२६२ किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडा पर्यंतचा हा प्रवास होणार आहे. राज्याची संस्कृती, वीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. लोकवर्गणीतून लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील स्थानिक मराठी बांधवांना आवश्यक ते सर्व पाठबळ राज्य शासन देईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण 20 भाषेत बोलक्या स्वरुपात (टॉकिंग स्टोरी) आणत आहोत. याशिवाय, शिवाजी महाराजांचा इतिहास अंधांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘जय भवानी जय शिवाजी’ हा चैतन्य आणि ऊर्जेचा हुंकार आहे. हा केवळ एक पुतळा नाही तर त्या माध्यमातून एक विचार आपण पाठवतोय. तो जगभरात जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा कुपवाडा येथे उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.