लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 


                पुणे - दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी आपले सर्वांचे आवडते अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरूष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त भ्रातृमंडळ वारजे पुणे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे आणि उपस्थित राहून मंडळाच्या कार्यास निस्वार्थीपणे सेवा केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. 

                 कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री. विकास ढाकणे साहेब अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, उपस्थितीत होते. त्यामुळे कार्यक्रमास अजूनही रंगत आली होती. मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. समाजातील तळागाळातील सर्व लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावे त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही यानिमित्ताने त्यांनी दिले.

                रक्तदान शिबिरास त्यांनी  मनापासून खूप खूप शुभेच्छा दिल्या. समाजातील खेड्यातून आलेल्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी भ्रातृमंडळाचे वसतिगृह व त्यांना दिली जाणारी शिक्षणासाठी बिनव्याजी आर्थिक मदत याबदल मंडळाचे कौतुक केले आणि अशाच प्रकारचे पुण्यात आणखी पाच ते सहा  वसतिगृह उभे राहिले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले, आणि भ्रातृमंडळाच्या या भव्य आयोजन साठी भ्रातृमंडळाचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. 

              आज जो काही रक्तदानाचा विक्रमी आकडा म्हणजेच एकशे ऐकोणसत्तर (१६९) पार झाला आहे त्यामागे रक्तदान शिबिरास उपस्थित सर्वांचे अथक परिश्रम होते. आज अगदी सकाळपासूनच कार्यक्रमासाठी एक वेगळाच उत्साह हा मंडळाच्या प्रत्येक उपस्थित कार्यकर्त्यात दिसून येत होता. 

                आज एक नवीन उपक्रम पण राबविण्यात आला तो म्हणजे मोफत नेत्र तपासणी व दंत तपासणी होय. या मोफत तपासणी शिबिरास पण उपस्थितांनी खूप छान प्रतिसाद दिला, याचा लाभ जवळपास जास्तीत जास्त उपस्थितांनी घेतला.

               आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आपल्या समाजातील पुणे तसेच पिंपरी-चिंचवड, रावेत, पुनावळे, अगदी वडगाव-शेरी, वाघोली, इत्यादी विविध ठिकाणाहून समाज बांधव तसेच इतर समाजातील बांधव ह्यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता उपस्थिती दाखविली. १६९ या जादुई आकड्याचे श्रेय मंडळाचे पदाधिकारी ह्यांना जाते.  

               या कार्यक्रमासाठी विशेष करून श्री अनिल बोंडे सर, पंकज जंगले, जितेंद्र भारंबे, सचिंद्र नेमाडे या प्रत्येकांनी आपल्या परीने जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन रक्त दाते जमवलेत ही कौतुकास्पद बाबच पाहिजे. 

                ससून रूग्णालयाचे रक्त संकलन विभागाचे समाजसेवा अधिक्षक ( वै.) श्री. शरद देसले, व त्यांचे सहकारी वर्ग, बी. जे. मेडिकलचे विद्यार्थी ह्यांनी रक्तदान शिबिरास जे काही अथक परीश्रम घेतले त्याबद्दल भ्रातृमंडळ वारजे पुणे तर्फे खूप खूप आभार.

             मोफत दंत तपासणी व नेत्र तपासणी साठी अनुक्रमे डॉ.चंदन बोरले, डॉ.आशुतोष पाटील व त्यांचा कर्मचारी वर्ग, ह्यांचे सुद्धा भ्रातृमंडळ तर्फे आभार, हे शिबिर यशस्वी करण्या करता मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते डॉक्टर श्री प्रेमानंद राणे ह्यांनी अथक परिश्रम घेतले. 

               आजच्या कार्यक्रमासाठी आलेला प्रत्येक जण हा नाष्टा, जेवण, आणि भ्रातृमंडळाची कामाप्रती सुसुत्रता याची अगदी मनापासून तारीफच करत होते. अशा प्रकारे हे महा रक्तदान शिबिर दुपारी तीन वाजेपर्यंत चालू होते. अजून काय एकंदरीत आजचा महा भव्य रक्तदान शिबीर हा कार्यक्रम खूपच छान सुंदर आणि  बहारदार झाला. असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करणे हिच अखंड भारताचे निर्माते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी मनोभावे श्रद्धांजली ठरेल. पुन्हा एकदा कार्यक्रमास उपस्थितांचे खूप खूप आभार.


Followers