सातारा :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.
यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार , त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.