पुरंदरमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसचा वरचष्मा ४ सरपंचास ५१ सदस्यांचा विजय, ३ ग्रामपंचायती बिनविरोध
सासवड :- पुरंदर तालुकयातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल आज सोमवारी ( दि. ६) सासवड येथील तहसील कार्यालयात जाहीर झाला. यामध्ये माळशिरस, वीर, भोसलेवाडी आणि आडाचीवाडी या ४ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने सरपंच पदासह एकहाती सत्ता मिळवली असून एकूण ५१ सदस्य निवडून आले असल्याची माहिती पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप पोमण यांनी दिली. एकूण १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी वाल्हे, आडाचीवाडी आणि सुकलवाडी या ३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या. पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी सर्व विजयी सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
पुरंदर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतींमध्ये तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव यांच्या पत्नी आरती ज्ञानेश्वर (माऊली) यादव यांनी सरपंचपदी ३४५ मतांनी विजय मिळविला., तसेच ११ पैकी काँग्रसचे ८ निवडून आले. तालुक्यातील मोठ्या असणाऱ्या वीर ग्रामपंचायतीमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा ट्रस्टचे अध्यक्ष काँग्रेसचे संतोष धुमाळ यांच्या पत्नी मंजूषा संतोष धुमाळ सरपंचपदी निवडून आल्या. याठिकाणी काँग्रेसचे ९ सदस्य निवडून आले. भोसलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे प्रविण भोसले यांच्या पत्नी शैला प्रविण भोसले सरपंचपदी तर काँग्रेसच्या विचाराचे ४ सदस्य निवडून आले. आडाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून येथे काँग्रेसच्या सुवर्णा बजरंग पवार सरपंचपदी विराजमान झाल्या. येथे काँग्रेसचे ३ सदस्य निवडून आले आहेत.
इतर गावांतील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :- कोथळे - ९ पैकी ५. कर्नलवाडी - ७ पैकी ३. राजुरी ९ पैकी ६. एखतपूर मुंजवडी - ७ पैकी ३. वागदरवाडी - ७ पैकी २. वाल्हे - बिनविरोध २. रानमळा - ७ पैकी ३. वनपुरी - ९ पैकी १. गुळूंचे - ९ पैकी १ आणि पोंढे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत १ पैकी १.
सेनापती पडले... सैन्य आले....
या निवडणूकीत कोथळे आणि राजुरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले. मात्र दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सदस्यसंख्या अधिक आहे. राजुरीमध्ये ९ पैकी काँग्रेसचे ६ तर कोथळे मध्ये ९ पैकी काँग्रेसचे ५ सदस्य विजयी झाले आहेत.
निधी कमी पडणार नाही - आ. संजय जगताप
पुरंदर हवेलीतील गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. पुरंदर हवेलीच्या विकासाचा रथ असाच पुढे घेऊन जायचे आहे असे असे सांगत आमदार संजय जगताप यांनी सर्व विजयी सरपंच आणि सदस्यांचे अभिनंदन केले. अत्यंत अटीतटीच्या होऊ पाहणार्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकतर्फी विजयाबद्दल आ संजय जगताप यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी सासवड येथील काँग्रेस कमिटीमध्ये तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदिप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, युवक प्रदेशचे महासचिव गणेश जगताप, प्रभारी अध्यक्ष चेतन महाजन, विकास इंदलकर, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, माजी पं. स. सदस्य दिलीप धुमाळ, पिनू काकडे, निरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर, सदस्य संदीप फडतरे, पुरंदर नागरीचे सख्यवस्थापक अनिल उरवणे आदी उपस्थित होते.