एमएसएमई उद्योगांनी संरक्षणविषयक सामग्री उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे येथे निबे कंपनीच्या नव्या प्लांटचे उद्घाटन
पुणे, :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनाच्या बाबतीत ‘आत्मनिर्भरता’ मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे सांगून ते म्हणाले की, नव्या संरक्षण सार्वजनिक उपक्रमांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढली असून दर्जेदार सामग्रीच्या खरेदीसाठी ते उपयुक्त ठरते आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी आज पुणे येथे निबे लिमिटेड या एमएसएमई उद्योगाच्या नव्या प्लांटचे दि. 19 फेब्रुवारी 24 ला उद्घाटन केले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत,नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.देशाच्या संरक्षण क्षेत्रात घडून आलेल्या बदलांची चर्चा करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणाले की पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून राज्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केले.
संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात निबे कंपनीने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकार 24 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे येथे एमएसएमई संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. संरक्षण क्षेत्रातील इतर आस्थापनांसोबत या प्रदर्शनात खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या देखील सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले.
प्रत्येक गरजेबाबत आत्मनिर्भर होण्याच्या नौदलाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत अॅडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की भारतीय नौदल स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये प्रगती करत आहे. वर्ष 2047 पर्यंत नौदलाने आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उद्योगांनी विशेषतः एमएसएमई उद्योगांनी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.