थेऊर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला तब्बल दीड दशकानंतर नवीन अध्यक्ष लाभणार आहे. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक बुधवारी (दि. 27) कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. त्यासाठी पिठासीन अधिकारी शीतल पाटील यांनी नवनियुक्त संचालक मंडळाला निवडीसाठी अजेंडा बजावला आहे. कारखान्याच्या तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासदांनी धक्कादायक निकालाची नोंद करीत कारखान्याची सूत्रे नवीन दमाच्या संचालक मंडळाच्या हाती सोपविली आहेत. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कारखान्याचे अध्यक्षपद प्रस्थापित घराण्यातील आडनावाऐवजी इतर आडनावाला मिळण्याची शक्यता आहे.
13 वर्षांपूर्वी अर्थिक भांगभांडवलाअभावी बंद पडलेल्या कारखान्यावर संचालक मंडळातून प्रत्यक्ष अध्यक्षपदाची निवड होणार आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप , कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर विकास आघाडीने वर्चस्व गाजवून 21 पैकी 18 जागांवर विजय संपादन केला होता. या सत्ताधारी गटाच्या संचालक मंडळात पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांचे बंधू व गत संचालक मंडळात संचालकपद भूषविलेले सुभाष जगताप हे एकमेव कारखान्याच्या कामाकाजाचा अनुभव असलेले संचालक अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असणार आहेत, तर दुसरीकडे कारखान्यासाठी न्यायालय, राज्य सरकार व प्रशासकीय पातळीवर सतत संघर्ष केलेले माजी संचालक पांडुरंग काळे यांचे चिरंजीव मोरेश्वर काळे हे पण शर्यतीत राहणार का, अशी चर्चा सुरू आहे.
यशवंत कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर कारखान्यावर गेली 13 वर्षे प्रशासकीय समितीची राजवट सुरू होती. प्रशासकीय समितीच्या कार्यकाळात संस्थेचे गतिशील कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. नियुक्त प्रशासक हे सरकारी अधिकारी असल्याने ते केवळ आपली औपचारिकता पूर्ण करीत होते. परंतु, आता लोकनियुक्त संचालक मंडळ नियुक्त झाल्याने प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यास मदत मिळणार आहे.