पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार यांच्याकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत.
मंचर येथे उद्या, मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.
आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी २००४ चा निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.
त्यानंतर आता तब्बल २० वर्षानंतर आढळराव पाटील हे स्वगृही परतत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेचे राजकारण देखील बदलल्याचे पहायला मिळणार आहे.