चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाच्या कामात गैरव्यवहार

      

 
पिंपरी : शाहूनगर, चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाचा पुनर्विकास करताना महापालिकेने एक कोटी ६६ लाखांचा खर्च केला आहे. निविदेतील अटी-शर्तीनुसार उद्यानाचे काम झाले नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. या कामात एक कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. याप्रकरणी ठेकेदार, सल्लागारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
        खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या वास्तुविशारदाला महापालिकेने सल्लागार पॅनलवर घेतले. या वास्तुविशारदाने नातेवाईक असलेल्या ठेकेदाराशी संगनमत करून उद्यानाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविले. काम करताना निविदेतील अटी-शर्तीनुसार साहित्य वापरले गेले नाही. हलक्या दर्जाचे, निकृष्ट साहित्य वापरून काम पूर्ण केले. देयक मात्र निविदेतील अटी-शर्तीनुसार देण्यात आले आहे. एक कोटी ६६ लाख रुपयांचे देयक ठेकेदाराला दिले आहे. यात ठेकेदाराने एक कोटी २० लाख रुपयांची लूट केल्याचा आरोप भापकर यांनी केला.
        याबाबत आयुक्तांकडे दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार केली होती. परंतु, यावर अद्यापही कारवाई केली नाही. आयुक्तांनी उद्यानात झालेल्या कामाच्या दर्जाची पाहणी करावी. संबंधित वास्तुविशारद, स्थापत्य, उद्यान, विद्युत, लेखापरीक्षक व निविदा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. ठेकेदाराचे देयक दिले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर उपअभियंत्याकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

        

Followers