खराडी, प्रतिनिधी:-
खराडी परिसरात मुख्य रस्त्यालगत एक अडीच वर्षाचा लहान चिमूरडा भर उन्हात रडत वाट मिळेल तिकडे अनवाणी पायाने चालत असताना तेथून पोटापाण्याच्या शोधार्थ निघालेल्या अरुणा शिंदे या महिलेच्या मातृत्वाला फुटलेला मायेचा पाझर या अडीच वर्षाच्या बालकाला सुखरूप त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचविणारा ठरला आहे.
अरुणा शिंदे या महिलेला अडीच वर्षांचे बाळ रस्त्यावर एकटे आढळले. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता तो काहीच सांगू शकत नव्हता म्हणून मुलाच्या सुरक्षेची काळजी घेत ताबडतोब बाळाला जवळ असलेल्या खराडी पोलीस चौकीत नेले. थोड्या वेळातच चिमुकल्याचे पालक त्यांच्या शोधार्थ हरवलेल्या मुलाबाबत तक्रार करण्यासाठी खराडी पोलीस चौकीत पोहोचले असता त्यांचा चिमुरडा एक महिलेसह आढळून येताच त्यांना हायसे वाटले. पोलिसांनी शहानिशा व संपूर्ण खात्री करून ताटातूट झालेल्या मायलेकराला पुन्हा एकत्र आणले.
यावेळी कामानिमित्त पोलीस चौकीत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या एका मनसे कार्यकर्त्याने या घटनेची दखल घेत बालकाला सुखरूप आई-वडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनिता शिंदे या महिलेचा मनसे पुणे उपशहर अध्यक्ष हेमंत बत्ते यांच्या हस्ते साईनगरी, चंदननगर येथील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात गौरव केला.
या वेळी मनसे गटप्रमुख साईनाथ भालके, तुषार टाकळकर, प्रणव जोशी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.