सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप हा एक सेतू : महेश अय्यंगार


सांगली, 20 ऑगस्ट 2024 जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो असे पत्र सूचना कार्यालय पुणे चे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले. पी आय बी च्या मुंबई कार्यालयाच्यावतीने सांगली येथे आयोजित केलेल्या 'वार्तालाप' या माध्यम कार्यशाळेत ते आज बोलत होते. समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचे वाढते प्रमाण बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्वपूर्ण झाली आहे, असे महेश अय्यंगार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. "फेक अर्थात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि खोट्या बातम्या उघडकीस आणण्यात, तथ्य समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार असू शकते" असे ते म्हणाले. खोट्या आणि तथ्यहीन बातम्यांपासून जनसामान्यांचे रक्षण करण्यासाठी दक्षतेला अनन्यसाधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. 

 खाद्यान्नविषयक तंत्रज्ञान, कीटक व्यवस्थापन अशा क्षेत्रात कार्यरतसंशोधन संस्था आणि पत्रकार यांच्यात संवाद साधण्यासाठी वार्तालाप यासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर या कार्यक्रमात, अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी बी मिश्रा यांनी परस्परसंवादीसत्रात बियाण्यांचा विकास, अन्न साठवणूक आणि कचरा व्यवस्थापन याविषयांमध्ये सध्या उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी अणुऊर्जा विभागाने तयार केलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली. अणुऊर्जा विभागाच्या उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया BARC संकेतस्थळ आणि संकेतस्थळाच्या च्या उद्योजक कॉर्नर विभागाला भेट द्या. सांगली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी कृषी वित्त क्षेत्रामधील बँकिंग क्षेत्राच्या भूमिकेविषयी सादरीकरण केले. त्यानंतर प्रादेशिक स्तरावरील मध्यवर्ती एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राचे संशोधक अमित जाधव यांनी कीटकनाशकांच्या अतिवापराचे धोके आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या अनुषंगाने विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे कीटक व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले. समारोपाच्या सत्रात शेतकरी उत्पादक संस्थेचे संदिप खुडे यांनी भारत सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा आपला अनुभव विषद केला त्यानंतर पत्र सूचना कार्यालय पुणे चे सहसंचालक महेश अय्यंगार आणि सेन्ट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन ,कोल्हापूरचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप, पीआयबीच्या संकेत स्थळाचा पत्रकारांना अधिक सक्षमपणे कसा उपयोग करता येईल त्याबरोबरच पत्रकार कल्याण योजना आदींबद्दल माहिती दिली. ही सादरीकरणे आणि चर्चांनंतर उपस्थित वार्ताहरांसोबत झालेल्या परिषदेत, आज झालेल्या सादरीकरण आणि चर्चांसंबंधीच्या सूचना आणि सर्वंकष अभिप्रायही घेतला गेला. या माध्यम कार्यशाळेत सांगलीमधील सुमारे 80 वार्ताहरांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

अणुऊर्जा विभागाविषयी (Department of Atomic Energy - DAE) अणुऊर्जा विभागाच्या कृषी संशोधनासंबंधी असलेले प्रश्न आणि अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या पत्ता, संकेतस्थळ, ईमेल आयडीवर संपर्क साधावा: संपर्कासाठी पत्ता: विभाग प्रमुख, अणुकृषी आणि जैवतंत्रज्ञान विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र 400 085 संकेतस्थळ : http://www.harc.gov.in, ईमेल : panabtd@barc.gov.in अणुऊर्जा विभागाच्या खाद्यान्नविषयक तंत्रज्ञानाविषयी असलेले प्रश्न आणि अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या पत्ता, संकेतस्थळ, ईमेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा: संपर्कासाठी पत्ता: विभाग प्रमुख, अन्न तंत्रज्ञान विभाग जैवविज्ञान गट, भाभा अणुसंशोधन केंद्र, अणुऊर्जा विभाग, भारत सरकार ईमेल : headftd@barc.gov.in ; दूरध्वनी क्रमांक: 022-25595742. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील वनस्पती संरक्षण, विलगीकरण आणि साठवणूक संचालनालय, कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण या विभागांअंतर्गतचे एक अधीनस्थ कार्यालय म्हणून महाराष्ट्र राज्यात नागपूर इथल्या प्रादेशिक स्तरीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राची स्थापना केली गेली आहे. ही संस्था 'दिसते त्यावर विश्वास ठेवणे' आणि 'प्रत्यक्ष कृतीतून शिकणे' या तत्वांवर काम करत आली आहे. याच तत्वाच्या आधारे या केंद्राने, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण प्रक्रियेत (Integrated pest management - IPM) महत्त्वाचे योगदान दिले आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत केंद्राद्वारे एकात्मिक कीड व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रमांसाठी मनुष्यबळाचे नियोजन करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. यात शेतकरी / कृषी तसेच फलोत्पादन विस्तार अधिकाऱ्यांकरता / कीटकनाशकविषयांशी संबंधित कृषीविषयक क्षेत्रिय प्रशिक्षण शाळा (Farmer Field School - FFS), अभिमुखता प्रशिक्षण उपक्रम (Orientation Training Programme - OTP), दीर्घकालीन हंगामी प्रक्षिण कार्यक्रम (Season Long Training Programme - SLTP) याचा समावेश आहे.

Followers