अमित ठाकरेंनंतर भाजपाचा शिवडीत मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा


मुंबई, : 
शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिला आहे. शिवडीत मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना आपला पाठिंबा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे. शेलार यांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) शिवडीतील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं की “तुम्ही मनसेचं इंजिन हे निवडणूक चिन्ह घराघरांत पोहोचवावं. मनसेसाठी, बाळा नांदगावकर यांच्यासाठी कंबर कसून प्रचार करा”. याआधी भारतीय जनता पार्टीने मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांनादेखील पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका आशिष शेलार व विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी घेतली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “पाठिंब्याबद्दल बाळा नांदगावकर किंवा मनसेने आपल्याला बोलण्याची वाट न पाहता आपण स्वतःहून त्यांचा प्रचार करू. स्वइंजिनाप्रमाणे आपण प्रचारात उतरू. मनसेचं स्वतःचं इंजिन (निवडणूक चिन्ह) आहेच. मी स्वइंजिनाबद्दल बोलतोय, म्हणजेच आपलं इंजिन. आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं, मनसेचं चिन्ह पोहोचवायचं. लोकांमध्ये जाऊन समस्त महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी या (शिवडी) मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणू. त्यासाठी तुम्हा सर्वांना कंबर कसावी लागेल”.

शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकरांचा सामना शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार व विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महायुती बाळा नांदगावकरांच्या पाठिमागे आपली ताकद उभी करेल, यात शंका नाही.

अमित ठाकरे महायुतीचे उमेदवार : आशिष शेलार

गेल्या आठवड्यात आशिष शेलार म्हणाले होते, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Followers